मंडई मेट्रो स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार आजपासून खुले   

पुणे : मंडई मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक तीन हे आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवरील प्रवेशद्वारांवर सरकते जिने (एस्केलेटर) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. मंडई मेट्रो स्थानक हे शहराच्या मध्यवस्तीतील स्थानक असून अनेक मध्यवर्ती स्थळापासून अत्यंत जवळ आहे. मंडई मेट्रो स्थानकाचे नव्याने सुरू झालेले प्रवेशद्वार क्रमांक ३ महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ आहे. 
 
या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांना बाबुगेनू गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग, शनिपार या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सोय करण्यात आली असून, आजपासून रामवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक २ आणि कासारवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ येथे आता सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. 
 
या प्रवेशद्वारांतून स्थानकात ये-जा करण्यासाठी यापूर्वीच जिना आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध होती, परंतु, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अधिक साहित्य असलेल्या व्यक्तींना अधिक सोयीचे होणार आहे. या नवीन सुविधांमुळे पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
 

Related Articles